पोलिसांची गंमत करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून ‘खाकी इंगा’ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हल्लीची तरुण पिढी काय करेल आणि काय नाही याचा नेम नाही. मुंबईतील तरूणाने गंमत म्हणून चक्क पोलिसांना स्वत:चे अपहरण केल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांची फसगत करु पाहणाऱ्या या भामट्याला पोलिसांनी चांगल्याच पोलिसी खाक्या दाखवल्या. या तरुणाला पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या. एवढेच नाही तर १००० रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. जर ही दंडाची रक्कम त्याने भरली नाही तर त्याला तीन दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.  शिवकुमार गौतम असे या तरुणाचे नाव आहे.
असा केला अपहरणाचा बनाव 
याबाबत अधिक माहिती अशी, वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकृत मोबाईलवर रात्री एका व्यक्तीचा फोन आला. माझे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तुंगारफाटा येथे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आहे, अशी माहिती शिवकुमार गौतम नावाच्या व्यक्तीने दिली. फोन करताना त्याने खूप घाबरल्याचेही भासवले. हे प्रकरण गंभीर असल्याचे पोलिसांना वाटल्याने त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तिथे कुणीही आढळले नाही.
फोन करणाऱ्या शिवकुमार याचाही फोन बंद झाला होता. तरी पोलिसांनी परिसर पिंजून काढला, अनेक ठिकाणी चौकशी केली. परंतु, असा काही प्रकार असल्याचे आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून गौतमच्या घरचा पत्ता काढला. पोलीस जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा शिवकुमार घरात झोपलेला आढळला. गंमत म्हणून असा फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ताबडतोब पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला एक हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास तीन दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सतीश दुबे या तरुणाने हत्या झाली आहे, असे सांगून पोलिसांना अशाच प्रकारे कामाला लावले होते. त्याला देखील पोलिसांनी नंतर अटक केली होती.