Hathras Case : कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना, आज हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी

हाथरस/लखनऊ : आज हाथरस प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी योगी सरकार रविवारी सकाळी पीडित कुटुंबाला लखनऊला हलवणार होते. परंतु मध्यरात्री या कुटुंबाला लखनऊला हलवण्यात आले. जिवाला धोका असल्याचे सांगत रात्रीचा प्रवास करण्यास पीडित कुटुंबाने विरोध दर्शवला होता.

पीडित कुटुंबाला घेऊन जाताना एसडीएम अंजली गंगवार यांनी म्हटले की, मी स्वत: पीडित कुटुंबासोबत जात आहे. कुटुंबाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यासाठी विशेष तयारी केली आहे. डीएम आणि एसपीदेखील सोबत आहेत. आज न्यायालयात पीडितेचे वडील, आई, भावासह पाचजण जबाब नोंदवणार असल्याचे समजते.

आमच्या जिवाला धोका
कुटुंबाला रविवारी सकाळी लखनऊला नेण्याची योजना पोलिसांनी आखली होती. मात्र दिवसभरात कोणतीही हालचाल झाली. रात्री या कुटुंबाला लखनऊला हलवण्याची तयारी करण्यात आली. परंतु, जिवाला धोका असल्याचे म्हणत कुटुंबाने निघण्यास नकार दिला. त्यानंतर ही कुटुंबं लखनऊकडे निघाले. उच्च न्यायालयाने हाथरस प्रकरणी गृह सचिव, डीजीपी, एसपी आणि हाथरसच्या डीएमना समन्स बजावले आहे.

देशभरात संताप
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातल्या चंदपा येथे 14 सप्टेंबरला एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तिच्यावर अलिगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना 29 सप्टेंबरला तिने अखेरचा श्वास घेतला. युपी पोलीसांनी तिच्या कुटुंबियांना घरात कोंडून त्यांच्या अनुपस्थितीत मृतदेह मध्यरात्री जाळून टाकला. मुलीचे शेवटचे दर्शनही कुटुंबियांना घेऊ दिले नाही. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी मोठा संघर्ष कराव लागला होता.