Pune News : श्रावणसरी फेम, मुळशी पॅटर्नचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरावटी गुंफणारे मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 47 वर्षाचे होते.

भिडे यांचे पार्थिव डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलेली अवंतिका, ऊन पाऊस, किती दिवसांनी आज, त्या पैलतीरावर मिळेल मजला, नुपूर, श्रावणसरी अशी अनेक गाणी गाजली. देऊळबंद, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाचे संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले होते. त्यातील अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत़.

संगीतविषयक अनेक कार्यक्रमात ते सहभागी होत असत. अनेक गायक, गायिकांना त्यांनी पुढे आणले आहे. पुण्यातील अनेक संगीत कार्यक्रमाचे संगीत संयोजक म्हणून ते प्रसिद्ध होते.