शेतकरी आंदोलन : कृषी कायद्यांसंदर्भात आज राष्ट्रपतींना भेटणार विरोधी पक्षांचे नेते, शरद पवार, राहुल गांधी यांचा समावेश

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदनंतर विरोधी पक्ष राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, एनसीपी प्रमुख शरद पवार आणि सीपीएम नेते सीताराम येचुरी असे 5 नेते या प्रतिनिधी मंडळात सहभागी होतील. विरोधी नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट आज सायंकाळी पाच वाजता घेतील. या भेटीपूर्वी विरोधी नेत्यांची बैठक होऊ शकते. तसेच, आज शेतकरी नेते आणि सरकारमध्ये सहाव्या टप्प्यातील बैठक होणार आहे.

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनी काल सांगितले की, विरोधी पक्षांचे नेते बुधवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपतींची भेट घेतील. कोरोना प्रोटोकॉलमुळे केवळ पाचच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी म्हटले होते की, राष्ट्रपतींची भेट घेण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांचे नेते तीनही कृषी कायद्यांवर सामुहिक भूमिका घेतील.

कृषी कायद्यांच्य मुद्द्यांवर राष्ट्रपतींना भेटणार्‍या प्रतिनिधी मंडळात सहभागी पक्षांनी भारत बंदला पाठींबा दिला होता. यावरून भाजपाने एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, यूपीए सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून असलेले शरद पवार यांनी राज्यांना एपीएमसी कायद्यात दुरूस्ती करण्यास सांगितले होते. पवार यांनी राज्यांना सावध केले होते की, केंद्राकडून आर्थिक मदत दिली जाणार नाही. परंतु, आता पवार स्वत: विरोध करत आहेत.

सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज पुन्हा बैठक
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सतत सुरू आहे. शेतकरी नेते तीनही कायदे रद्द करण्याशिवाय इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार नाहीत. यावर त्यांची सरकारसोबत आतापर्यंत पाचवेळा चर्चा झाली आहे, परंतु अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. सरकारसोबत आज होणार्‍या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी रात्री 13 शेतकरी संघटनांसोबत बैठक केली.