शेतकरी आंदोलन : … नाही तर काही जण न बोलावता पाकिस्तानी बिर्याणी खाऊन येतात ; काँग्रेस नेत्याचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सरकारकडून देण्यात आलेले जेवण नाकारले. यालाच तर स्वाभिमान म्हणतात. नाही तर काही जण न बोलावताच बिर्याणी खाऊन येतात आणि तीदेखील पाकिस्तानी, असे म्हणत काँग्रेसचे नेते भाई जगताप (congress-leader-bhai-jagtap) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.

तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ तास चाललेली बैठक अखेर निष्फळ ठरली आहे.

या बैठकीत कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान जेवणाच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून सरकारचे जेवण नाकारण्यात आले आहे. आम्ही सरकारी जेवण किंवा चहा स्वीकारणार नाही. आम्ही आमचे जेवण सोबत आणले आहे, अशी भूमिका चर्चेसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. यासंदर्भातील एक फोटोदेखील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय झाले बैठकीत?

बैठकीत शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यांवर 39 आक्षेप केंद्रीय मंत्र्यांसमोर नोंदवले. त्यातील आठ आक्षेपांवर पुनर्विचार करण्याची व दुरुस्ती करण्याची तयारी मंत्र्यांनी दाखवली. शेतकऱ्यांचे आक्षेप मान्य असतील तर कायदे रद्द करण्याची मागणीही मान्य करावी, असे शेतकरी नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले, अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिली. या बैठकीत पंजाबसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी 41 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.