शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही : शरद पवार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील शेतकरी वर्ग संपावर गेला असून त्यांना टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही. एक शेतकरी म्हणून माझाही या संपाला पाठिंबा आहे. असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते मुंबईत बोलत होते.

राज्यातील शेतकरी १ जून पासून संपावर गेला आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागात दिसत आहे. शेतकऱ्यांनी पालेभाज्या रस्त्यावर फेकल्या, दूध ओतून दिले आहे. अशा पद्धतीने शेतकरी भाजप सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसत अाहेत.

यावेळी शरद पवार म्हणाले की, या भाजपने शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले अाहे. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे शेतकरी संपावर गेला आहे.

ते पुढे म्हणाले की, या आंदोलनात रस्त्यावर दूध ओतून न देता ते गरीब मोहल्ल्यात वाटप करावे. त्यातून गरिबांची सहानभूती मिळेल. पिकाची नासाडी होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी संपावर कायम असल्याने याचे परिणाम ग्रामीण भागासह शहरी भागात देखील दिसत आहेत. यावर सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. त्यात शरद पवार यांनी शेतकयांच्या संपाला पाठींबा दिल्याने आता सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.