राष्ट्रवादीच्या बडया नेत्याचा मनसेवर निशाणा, म्हणाले – ‘राज ठाकरेंना सध्या प्रसिध्दीची गरज’

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलीस ठाण्यात २०१४ साली गुन्हा दाखल करण्यात होता. त्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य करत शाब्दिक फटकेबाजी केली.

राज ठाकरे म्हणाले, शेतकरी आंदोलन जरा जास्त चिघळले, जे होण्याची आवश्यकता नव्हती. कृषी कायद्यांत त्रुटी असू शकतात. हे नाकारता येत नाही, मात्र केंद्र सरकारने राज्यांचा विचार करुन, राज्यांची चर्चा करुन याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावरती वार्ताहरांनी ठाकरे यांच्या कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबत या भूमिकेमुळे अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यांची कृषी कायद्यांबाबतची नेमकी भूमिका काय, ते कृषी कायद्याचं समर्थन करत आहेत, असा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारला. त्यावर सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.

अदानी पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. मात्र, त्यानंतर सरकारने निर्णय सांगितला की, वीज बिल माफ केलं जाणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांची ही वक्तव्य पाहता हे सार प्रसिद्धीसाठी केलं जात आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, जयंत पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम साथ गतीने सुरु असून, आजवर ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय आताची अद्ययावत किंमत १३ हजार ८७५ कोटी रुपये झाली आहे. लवकरच जिगाव प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.