मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शेतकरी, लहान मुलीला पोलिसांनी मातोश्रीबाहेरून घेतलं ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आलेल्या शेतकरी आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे देशमुख नावाच्या या शेतकऱ्यास मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतले आहे. देशमुख पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आले असल्याची माहिती समजते आहे.

देशमुख हे पूर्णतः कर्जात बुडाले होते, त्यामुळे त्यांनी आपली समस्या घेऊन वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर आज ते पुन्हा एकदा आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र मातोश्रीवर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवत त्यांना आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. यावेळी या शेतकऱ्यासह छोट्या मुलीला धक्काबुक्की झाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शेतकरी आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये बसवले.

दरम्यान, त्या दोघांनाही खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, मातोश्रीवर भेटण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी असे वागावे लागते, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/