UP : 23 मुलांना ओलिस ठेवणार्‍या माथेफिरूची ‘चिठ्ठी’ होतेय ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युपीच्या फर्रुखाबादमध्ये 11 तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर मुलांना ओलीस ठेवलेल्या माथेफिरुचा एन्काउंटर करून पोलिसांना 23 मुलांचा जीव वाचविण्यात यश आले. दरम्यान, त्या आरोपीने लिहिलेले एक पत्र व्हायरल होत आहे.

फर्रुखाबादमधील कार्ठिया गावात एका माथेफिरूने वाढदिवसाच्या बहाण्याने 23 निर्दोष लोकांना 11 तास बंदी बनविले होते. सुभाष बाथम असे या आरोपीचे नाव असून यासंबंधी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी पोलिस दलासह घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीच्या घराला घेरले. यानंतर पोलिसांनी मुलांना ओलिस ठेवलेल्या आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्याने पोलिसांवरच गोळीबार सुरू केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत आरोपीची ठार झाला.

आरोपीचे पत्र व्हायरल:
दरम्यान, या आरोपीचे एक पत्र व्हायरल होत आहे. यात त्याने आपल्या काही मागण्या लिहून ठेवल्या. आपल्याला घर मिळालेले नाही, असा उल्लेख त्याने या पत्रात केला. सोबतच त्याने शौचालयाचाही उल्लेख केला. पत्रात असे लिहिले की, त्याच्यासाठी घर आले होते. परंतु प्रधानाने ते देण्यास नकार दिला. पत्रात त्याने लिहिले की, त्याची आई हालचाल करण्यास सक्षम नाही. तीच्यासाठी शौचालयाचीही मागणी केली होती. पुढे त्याने असेही लिहिले आहे की सेक्रेटरी आणि इतर अधिकाऱ्यांना अनेक वेळा भेट देऊनही त्याचे काम झालेले नाही.

दरम्यान, डीजीपी ओ. पी. सिंह यांनी या ऑपरेशनची यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती देताना पी. सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 23 मुले वाचविणाऱ्या यूपी पोलिसांच्या पथकाला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ते म्हणाले की, आयजी रेंज कानपूर आणि डीएम व एसपी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 2001 मध्ये गावच्या माणसाचा खून केल्याचा आरोपही या आरोपीवर होता. खून प्रकरणात तो सध्या जामिनावर बाहेर आला होता.

कसे केले मुलांना बंधक :
महंमदाबाद परिसरातील कार्ठिया गावात राहणाऱ्या रहिवाशाने वाढदिवसाच्या बहाण्याने 23 मुलांना आपल्या घरी बोलावले आणि काही वेळाने सर्वांना एका खोलीत बंद केले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जेव्हा गावकऱ्यांनी मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या माथेफिरुने तेथील ग्रामस्थांना धमकी देत तेथून दूर केले. त्या माथेफिरूने मुलांची सुटका करणाऱ्या एका गावकऱ्याला गोळी घातली, त्यानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मुले व महिलांना ओलीस ठेवल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली, त्यानंतर स्थानिक पोलिस अधीक्षक अनिल कुमार मिश्रा आणि सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मुले व महिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. या बचाव मोहिमेदरम्यान आरोपीने पोलिसांवरही गोळीबार केला.

या गोळीबारात एसएचओसह तीन पोलिस जखमी झाले, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर पोलिसांच्या प्रत्युत्तरात रात्री एक वाजेच्या सुमारास आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आणि सर्व 23 मुलांना सुखरूप वाचविण्यात यश आले.