नवरात्रीमध्ये उपवास का करावा ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आता गणपती नंतर सगळ्यांना नवरात्रीची चाहूल लागली आहे. नवरात्रीत नऊ विविध रंगाचे कपडे परिधान करून मातेची पूजा अर्चना मोठ्या श्रद्धेने केली जाते. बरीच मंडळी यादरम्यान नऊ दिवसांचा उपवासही करतात. पण तुम्हाला माहित आहे का, नवरात्रीच्या वेळी उपवास का करावा ? जाणून घेऊ नवरात्रातील उपवासाचे महत्त्व

नवरात्रीच्या वेळी उपवास का करावा ?

नवरात्रोत्सव हा रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य यांचा उत्सव आहे, शिवाय विश्रांती घेण्याची आणि आपल्या शरीरातील उर्जेची पातळी वाढविण्याची ही वेळ असते . नवरात्रीच्या काळात उपवास केल्याने परमानंद व आनंद मिळण्याचा मार्ग हा सुकर होतो. यामुळे मनाची अस्वस्थता दूर होते आणि मनाला शांती लाभते.

आयुर्वेदानुसार उपवासामुळे जठरात अग्नी प्रज्वलित होते. यामुळे, आपल्या शरीरात विषारी पदार्थ नष्ट होतात. हे विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकल्यामुळे शरीरातील सुस्तपणा कमी होतो. नवचैतन्य शरीराच्या स्नायूंमध्ये जागृत होतात. म्हणून उपवास हे शारीरिक शुध्दीकरणासाठी एक प्रभावी यंत्रणा मानली जाते. शरीराच्या शुध्दीकरणासह, मन देखील शांत आणि स्थिर होते कारण शरीर आणि मन यांच्यात एक खोल संबंध असते.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सवय असते की भूक लागण्याच्या आधीच जेवण करणे . भूक लागणे म्हणजे आपले शरीर आता अन्न पचनासाठी तयार आहे. भूक लागण्यापूर्वी अन्नपदार्थाचे सेवन केल्याने आपली पाचक प्रणाली क्षीण होते. परिणामी, तणाव वाढतो आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.
उपवास केल्याने पोट हलके होते ज्यामुळे तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

नवरात्र म्हणजे ध्यान करण्याची आणि आपल्या अस्तित्वाच्या स्त्रोताशी जोडण्याची वेळ.उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते आणि ध्यान करण्यात मन एकाग्र होते. उपवासावेळी शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी फळे खाणे उत्तम असते.