मुलाचे आजारपण आणि मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याची आत्महत्या

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी राजेंद्र महादेव तावरे (वय ४५ ) या व्यक्तीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली असुन पोलिसांनी आज या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिसुर्टी ता.पुरंदर येथील एका विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती येथील पोलीस पाटील सुजाता बारकडे यांना समजली. त्यांनी याबाबत खात्री करून घटनेची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला दिली.

यानंतर वाल्हा पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार श्रीरंग निगडे, हनुमंत गार्डी, संदीप पवार यांंनी घटना स्थळी जावुन तेथील नागरीकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मात्र रघुनाथ बरकडे यांना या खोल विहिरीत खाली उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मृतदेह बाहेर काढला असता तो व्यक्ती जेऊर येथील राजेंद्र महादेव तावरे असल्याचे उपस्थितांनी ओळखले. तावरे यांचा सलूनचा व्यवसाय असून ते जेऊर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्याला वाचवण्यासाठी त्यांना खूप खर्च करावा लागला होता. त्यांच्या मुलीचाही विवाह निश्चित झाला असून १२  मे रोजी विवाह होणार होता.

मुलाच्या आजारपणात झालेला खर्च व मुलीच्या लग्नात होऊ घातलेला खर्च याच्या चिंतेत ते होते. अशी चर्चा जेऊर ग्रामस्थांंमध्ये सध्या सुरु आहे. मुलीच्या विवाहापूर्वीच पित्याने स्वतःला संपविल्याने या भागातील लोकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटना स्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी भेट दिली तर घटनेचा तपास सहायक फौजदार श्रीरंग निगडे करीत आहेत.