हिंदू राष्ट्र सेना, धनंजय देसाई समर्थकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याची जामिनावर सुटका झाल्यानंतर शहरात विना परवाना मिरवणुक काढणाऱ्या त्याच्या समर्थकांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय ऊर्फ मनोज जयराम देसाईचा मावस भाऊ मनोज धुमाळ (रा़ चिंचवड), प्रतिक सांगळे (रा़ भेकराईनगर, फुरसुंगी रोड), प्रसाद पानसरे, वैजनाथ भगत (रा़ मांजरी) व सुमारे १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. येरवडा कारागृहातून धनंजय देसाई याची शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सुटका झाली. शहरात जमावबंदी आदेश असताना मनोज धुमाळ व त्याच्या साथीदारांनी या आदेशाचा भंग करुन १०० ते १५० जणांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवरुन येरवडा कारागृहासमोर एकत्र आले.

त्यांनी एका चारचाकी वाहनामध्ये बसवून त्याच्या छतास असलेल्या रुफमधून बाहेर उभे करुन तसेच या वाहनाच्या दोन्ही बाजूला फुटबोर्डवर १० ते १२ कार्यकर्ते उभे राहून घोषणा दिल्या. त्याबरोबर अनेक दुचाकी, चारचाकीवर भगवे झेंडे घेऊन स्वत:च्या व इतरांच्या जीवितास धोका होईल, अशा प्रकारे वाहने चालवित येरवडा कारागृहापासून विना परवाना रॅली काढून मोटार व्हेईकल कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय देसाईची जामीनावर सुटका ; भगव्या झेंड्यांसह समर्थकांची रॅली