इंदापूरसाठी उजनीतून 5 TMC पाणी उचलण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील शेतीला आता अच्छे दिन येणार आहेत. तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व निरा डावा कालव्यावरील 22 गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातून 5 टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. जलसंपदा मंत्रालयाने याबाबत निर्णय पारित केला असून त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सदर योजनेसाठी सुमारे 600 कोटींचा निधी खर्च होणार आहे. या योजनेसाठी 2 वषार्चा कालावधी जाणार आहे. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाबाबत तालुक्यातील शेतक-यानी आनंद व्यक्त केला आहे.

खडकवासला कालव्यावरील शेटफळगढे पासून ते बेडशिंगेपर्यंत 36 गावांना उन्हाळी आवर्तनात टंचाई निर्माण होत होती. तसेच निरा डावा कालव्यावरील 22 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनानाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भरणे यांच्या प्रयत्नान यश आले आहे. याबाबत मंत्री भरणे म्हणाले की, कुंभारगांव परिसरातील उजनी जलाशयातून 10 हजार एचपी क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे 10 किमी अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. त्या ठिकाणाहून हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडसिंगेपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी जाईल. सणसर जोड कालवातुन नीरा डाव्या कालव्यावरील 22 गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. दरम्यान तालुक्यातील हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतक-यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.