कोचिंग क्लासेस मालक आणि तावडेंमध्ये आर्थिक देवाण-घेवाण : अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत येथील कोचिंग क्लासेसमध्ये लागलेल्या आगित २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनोद तावडे आणि राज्यातील कोचिंग क्लासेचे मालक यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप केला आहे. तसेच खासगी शिकवणीचा मसुदा तयार असूनही तो पडून असल्याचे देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे.

खासगी शिवकवणीचा मसूद्याला तात्काळ मंजुरी मिळावी अशी मागणी करताना देशमुख म्हणाले, विनोद तावडे हे या मसुद्याकडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.  विनोद तावडे यांनी खासगी शिवकवणीचा मसुदा नागपूर अधिवेशनात मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचे देशमुख म्हणाले. खासगी शिवकणीबाबत कायदा करावा यासाठी अनेकवेळा मागणी करण्यात आली. मात्र, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे कोचिंग क्लासेस मालकांसोबत आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळे तावडे हे त्यांना मदत करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरत येथील एका कोचिंग क्लासला आग लागली होती. या घटनेत २२ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी घटना महाराष्ट्रात होऊ शकते. राज्यामध्ये जवळपास लाखोंच्या घरात कोचिंग क्लासेस आहेत. या क्लासेसचे फायर ऑडीट होत नाही. तसेच जर सुरत सारखी घटना घडली तर मुलांना बाहेर पडण्यासाठी जागा नाही. राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसवर कोणतेही निर्बंध नसल्याचा आरोप करत राज्यात लवकरात लवकर कायदा बनवण्यात यावा अशी मागणी केली आहे.