‘औषधे’ आणि उत्पादनांची ‘दिशाभूल’ करणाऱ्या जाहिरातींवर 50 लाख दंड आणि 5 वर्ष होणार ‘जेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकाने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम, 1954 मध्ये सुधारित विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्वचा, बहिरेपणा, केस गळणे किंवा पांढरे होणे, लठ्ठपणा कमी करणे इत्यांदीसाठी फार्मास्युटिकल उत्पादनाच्या जाहिराती करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती नियंत्रित करण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर 50 लाखांचा दंड आणि 5 वर्षाचा तुरुंगवास अशी तरतूद करण्यात आली आहे.

नवीन मसुद्यात पहिल्यांदाच ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपर्ह जाहिरात) कायदा 2020 अंतर्गत दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 20 लाखापर्यंत दंड ठोठाण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुन्हा दोषी आढळल्यास त्याला 50 लाखांपर्यंतचा दंड आणि 5 वर्षापर्य़ंत तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. सध्या या कायद्यामध्ये सहा महिन्याचा तुरुंगवास आणि दंडाची तरतुद आहे. तर पुन्हा दोषी आढळल्यास एक वर्षापर्य़ंत तुरुंगावासाची शिक्षा आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बदलता काळ आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी ही दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. अशा कोणत्याही औषधाची किंवा उत्पादनाची ऑडिओ किंवा व्हिडिओची जाहिरात ज्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असेल तर तो गुन्हा मानला जाईल. मंत्रालयाने या विधेयकाच्या मसुद्यासंदर्भात सूचना, बदलाबाबत काही हरकती असल्यास 45 दिवसांत पाठवण्याचे आवाहन केले आहे.