नीरा नदीला ‘महापूर’, धोक्याची पातळी ओलांडली ; ‘वीर’मधून ७० हजार क्युसेक्सने ‘विसर्ग’

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नीरा नदीला महापूर आला. त्यामुळे नीरेतील नदीकाठच्या डोंबारी वस्तीत शनिवारी रात्री पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना जुन्या मराठी शाळेत हलविण्यात आले तर स्मशानभूमीत पाणी शिरल्याने एका व्यक्तीचा अंत्यविधी दुसऱ्या गावात करावा लागला. नीरा नदीवरील ब्रिटीश कालीन पुल पाण्याखाली गेल्याने नीरा गावातील पुरस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी व वीर धरण साखळीत पावसाने धुमाकूळ घातल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ४) पहाटे २.४५ वाजता ६० हजार ४८२ क्युसेक्सने नीरा नदीत विसर्ग सोडण्यात आल्याने माऊलींच्या पादुकांना नीरा स्नानासाठी ज्या नीरा नदीवरी पुलावरून नेले जाते तो पुल व दत्त मंदिरही पाण्याखाली गेला आहे. नीरा येथील ज्युबिलंट काँलनीमधील लक्ष्मण दादासो निगडे (वय-६२) यांचे रविवारी सकाळी निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधी नीरा येथील स्मशानभूमीत पाणी शिरल्याने दुसऱ्या गावातील स्मशानभूमीत करण्यात आला. तसेच नीरा गावातील डोंबारी वस्तीत शनिवारी रात्री पाणी शिरल्याने ग्रामसेवक सुभाष लिंबरकर, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल आप्पा लकडे यांनी तेथील रहिवाशांना मराठी शाळेत हलविले. तर ग्रामस्थांनी त्यांना अन्न धान्य देऊन मदतीचा हात दिला.

नीरा व परिसरातील नागरिक, महिला व मुलांनी पुर पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी नदीच्या नविन पुलावर दिवसभर गर्दी केली होती. लोणंदचे स.पो.नि. संतोष चौधरी यांनी पाडेगांवच्या हद्दीत बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, पावसाच्या सततच्या कोसळधारेमुळे वीर धरणातून रविवारी (दि. ४) दुपारी ३.४५ वाजता पाण्यात वाढ करून ७० हजार क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात आल्याने नीरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुर स्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आपात्कालीन यंंत्रणेस पाचारण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैव बलवत्तर म्हणून पाण्यातून वृद्ध बचावले.

विठ्ठल भोसले (वय- ७०) रा. नवसर्कल – साखरवाडी (ता. फलटण) हे मुले सांभाळत नाही म्हणून गेली काही वर्षांंपासून नीरा नदी काठी असलेल्या दत्त मंदिराची सेवा करून भक्त निवासात राहतात. मात्र या वृद्धांंना रात्रीत नदीला पुर आल्याने भक्तनिवासात पाणी शिरल्याचे कल्पना नव्हती. त्यामुळे ते पाण्यात अडकल्याने घाबरले होते. मात्र दत्त मंदिरातील पुजारी समीर पाळधीकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काही तरूणांच्या मदतीने भक्त निवासातील वृद्धांंना पाण्यातून काढले. त्यानंतर त्यांना लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून ७० वर्षीय वृद्ध बचावले.

आरोग्यविषयक वृत्त