पुण्यात 7 हजार जणांवर FIR, 24000 वाहने जप्त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तबल 7 हजार 361 नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून. 23 हजार 900 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 144 नुसार 24 हजार 7 38 जणांस नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पुण्यात असल्याचे आढळून आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढतच चालला आहे. तो वाढू नये यासाठी शासनान विविध उपाययोजना करत आहेत. 19 मार्चपासून जमावबंदी व वाहनबंदीचे आदेश लागू केले आहेत. नागरिकांनी घरात राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच, आश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे, असे सांगितले होते. तरीही नागरिक विनाकारण बाहेर पडत होते. त्यामुळे पोलिसांनी थेट कारवाईला सुरूवात केली. तसेच, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची वाहने देखील जप्त करण्यात येत होती. तसेच, काही जणांस नोटीस बजावून बाहेर पडण्याचे कारण विचारले जात होते. त्यांच्याकडून कारण योग्य न सांगितल्यास त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सुरवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केले होते. पण, त्यामध्ये आता तीन मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी 19 मार्च पासून नियमभंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरवात केली आहे. 16 एप्रिलपर्यंत पुण्यात नियमभंग करणाऱ्या 7 हजार 361 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 23 हजार 946 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, कलम 144 च्या 24 हजार 738 जणांस नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. झोननुसार विचार केल्यास सर्वाधिक कारवाई ही कोथरुड, वारजे, उत्तमनगर, सिंहगड रोड, दत्तवाडी, अलंकार पोलिस ठाणे असलेल्या झोन तीनमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन हजार गुन्हे, पाच हजार तीनशे दुचाकी जप्त आणि 17 हजार 480 जणांस नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील कारवाई सर्वाधिक आहे.

—चौकट—

कारवाई वाढविली आहे

शहरात दोन दिवसांपासून सकाळी फिरण्यास जाणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी असताना देखील नागरिक सकाळी बाहेर पडत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर सर्व पोलिस ठाणे व गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मास्क न घालता बाहेर पडणाऱ्या 127 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी कारवाई बरोबरच सकाळी फिरण्यासाठी गेलेल्यांकडून व्यायाम, योगा करून घेत उड्या मारण्याची शिक्षा दिली. त्यानंतर काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.