मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या’ मुलावर लिहिला ‘हा’ लेख ; वृत्तपत्राच्या संपादकाविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरु: वृत्तसंस्था राजकीय मंडळी कशावरून कधी चिडतील हे सांगता येत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाबाबत ‘दैनिक विश्ववाणी’ या वृत्तपत्रात लेख छापून आला होता. यावरून वृत्तपत्राचे संपादक विश्वेश्वर भट यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल देवेगौडा याचा लोकसभा निवडणुकीत मंड्या मतदार संघातून पराभव झाला. त्यांच्या या पराभवानंतर हा लेख छापण्यात आला होता. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला. त्यामुळे जेडीएसचे सचिव प्रदिप कुमार यांनी पोलीसांत तक्रार केली.

कर्नाटकातल्या मंड्या मतदारसंघात निखिल देवेगौडा यांच्यासमोर अपक्ष उमेदवार सुमालथा यांचे आव्हान होते. मात्र निखिल यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मंड्या हा मतदारसंघ देवेगौडा कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघासाठी निखील यांनी हट्ट धरला होता. नातवाच्या हट्टासाठी एचडी देवेगौडा यांनी स्वतः तुमकूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि निखील यांना मंड्या येथून उमेदवारी दिली होती. मात्र या दोघांनाही पराभव पत्कारावा लागला. या निकालानंतर २५ मे रोजी निखील देवेगौडा यांच्याशी संबंधित लेख ‘विश्ववाणी’मध्ये छापण्यात आला होता. त्यामुळे जेडीएसने पोलीसांत तक्रार केली आहे.

दरम्यान, निखील यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या आपल्या पराभवाबद्दल आजोबा एचडी देवेगौडा यांच्याशी भांडण केले. आपले राजकीय करियर संपविल्याबद्दल आजोबांना दोष दिला आहे, असा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. तर  जेडीएसचे सचिव प्रदिप कुमार यांनी संबंधित लेखात अवास्तव गोष्टी छापल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे. तसंच या लेखामुळे देवेगौडा कुटुंबाची बदनामी होत आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे.