Pune News : लग्न सोहळ्याला पाहुण्यांची गर्दी झाल्यानं मंगल कार्यालयाच्या मालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नियम व अटी लागू केल्या आहेत. मात्र, लोक याचे पालन करताना दिसत नाही. नुकताच बेल्हा गावच्या हद्दीत एका विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने मंगल कार्यालय मालकांवर आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार. शनिवार (ता. २७) बेल्हा (ता.जुन्नर) येथील राज दरबार मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित केला होता. मंगल कार्यालयाचे मालक सुनील रामदास बडे यांनी जुन्नर येथील वाघ-भोसले यांच्या कुंटुबातील विवाह सोहळ्यासाठी हे कार्यालय उपलब्ध करुन दिले होते. यावेळी सदर मंगल कार्यालयामध्ये अंदाजे ५०० ते ६०० लोक एकत्र जमले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आले नाही. मास्क व सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन न करता विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असूनही खबरदारी घेतली नाही. हे कृत्य निष्काळजी आणि धोकादायक असून जिल्हाधिकारी पुणे यांचे नमूद आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यलय मालकांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार करत आहे.