गाडी आडवून खंडणीसाठी धमकावणार्‍या चौघांविरूध्द रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये FIR

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत गाडी आडवी लावून दर महिन्याला पंधरा हजार रुपये का देत नाही असे म्हणून गाडीच्या काचा फोडून दमदाटी केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे चार जणांवर विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिजीत पंढरीनाथ शिंदे यांनी रांजणगाव गणपती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शुभम वाबळे (पूर्ण नाव माहिती नाही ) व त्याचे इतर तीन अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता फिर्यादी अभिजीत शिंदे हे आपल्या कंपनीतील सहकाऱ्यांबरोबर स्वरासकी कंपनी जवळील रोड वरून त्यांच्या इंडिया सिया प्रेझेसेल मेटल प्रा. लि. या कंपनीमध्ये जात असताना रोड वर शुभम वाबळे व त्याच्या सोबत असणारे इतर तीन अनोळखी साथीदार यांनी फिर्यादी यांची ईको कार क्रमांक MH १२ kj ४५५८ ही आडवून शुभम वाबळे यांनी फिर्यादीला “तुला लई माज आलाय का तू दर महिन्याला १५ हजार रुपये का देत नाही” असे म्हणून कारची काच फोडली, तर बरोबर असणाऱ्या इतर तिघा तरुणांनी इको कारच्या इतरही काचा फोडून नुकसान करून, दमदाटी शिवीगाळ करून निघून गेले.

याबाबत अभिजीत शिंदे यांनी रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शुभम वाबळे व त्याचे इतर तीन साथीदार विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर तेलंग करीत आहे .