ठाण्याजवळील मुंब्रा परिसरातील हॉस्पिटलमध्ये आग, 4 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील ६ पैकी ४ रुग्णांचा मृत्यु झाला. बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या संकटांबरोबरच आता रुग्णालयांना आगी लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. एका बाजूला उपचारासाठी बेड मिळत नाही आणि बेड मिळाल्यावर आगीमध्ये रुग्णांचा मृत्यु होत आहे.
यास्मीन सय्यद (वय ४६), नवाब शेख (वय ४७) हलिमा सलमानी (वय ७०) आणि हरीश सोनावणे (वय ५७) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयात एकूण २० बेड होते. त्यापैकी १४ रुग्ण जनरल वॉर्डात होते. तर सहा रुग्ण अतिदक्षता विभागात होते. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ३ बंब, २ वॉटर टँकर आणि एक रेस्क्यु वाहनासह दाखल झाले. त्यांना काही वेळातच आग विझविण्यात यश आले. दरम्यान, आग लागलेल्या रुग्णालयातील सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, यातील अतिदक्षता विभागातील ६ पैकी ४ रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविताना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून आगी घटना का व कशी घडली हे शोधण्यासाठी समिती नेमून ती चौकशी करेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.