जाणून घ्या विरारमधील विजय वल्लभ हॉस्पीटलमध्ये नेमकं काय घडलं? 13 जणांचा झालाय मृत्यू

ठाणेः पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांनी आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येथील विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्री AC चा स्फोट झाल्याने ICU मध्ये लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

उमा सुरेश कनगुटकर (वय 63), निलेश भोईर (35 वर्ष), पुखराज वल्लभदास वैष्णव ( 68 वर्ष), रजनी आर. कडू (वय 60), नरेंद्र शंकर शिंदे (वय 58), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे ( 63), कुमार किशोर दोशी (वय 45), रमेश टी उपयान, ( 55), प्रविण शिवलाल गोडा (वय 65), अमेय राजेश राऊत (वय 23), शमा अरुण म्हात्रे (वय 48), सुवर्णा एस पितळे (वय 64), सुप्रिया देशमुख (वय 43) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहेत.

 

 

 

 

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्री 3 च्या सुमारास एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली. यावेळी अतिदक्षता विभागात 17 रुग्ण होते. यातील चौघांनी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र इतर रुग्णांना आपला जीव वाचवता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. रुग्णालयात एकूण 90 रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसेच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हविण्यात आले आहे. गंभीर प्रकृती असणा-या 21 रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले असून यात चौदा महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.