मृत बालकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – (Bhandara) येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश देण्याबरोबरच याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.