अग्निशमन जवानाची जीवाची बाजी ; कालव्यात बुडणाऱ्या महिलेला जीवदान

पुणे: पाेलीसनामा ऑनलाईन- आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास जनता वसाहत येथे असणाऱ्या कालव्यात एका महिलेला वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानाला यश आले आहे. दलाचे जवान जीवाची बाजी लावून कशाप्रकारे कर्तव्य बजावतात याचे एक बोलके चित्रच या घटनेतून पाहायला मिळाले.

जनता वसाहत येथे आज दुपारी एक वाजता कालव्यामधून एक महिला (वय अंदाजे ३० वर्षे, राहणार – जनता वसाहत) पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांनी पाहिले. त्याचवेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्याच सुरु झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवान विनायक माळी यांना याबाबत वर्दि दिली. जवान माळी यांनी त्यांचे सहकारी जवान सचिन आवाळे यांना सांगताच आवाळे यांनी क्षणाचा ही विलंब न करता अंगावरील गणवेश उतरवून लगेचच पाण्यात उडी मारली. त्यांनी कालव्यात उडी मारताच सदर महिलेचे अंतर पाहून त्यांनी शिताफीने तेवढे अंतर पार करत त्या बुडणाऱ्या महिलेला जिंवत बाहेर काढले.

त्या महिलेला प्राथमिक उपचार ही दिले आणि शासकीय रुग्णवाहिका बोलावून दवाखान्यात रवाना केले. सदर महिलेने नेमकी कशामुळे उडी मारली अथवा नेमके काय घडले याची अधिक माहिती समजू शकली नाही. जवान आवाळे यांनी केलेल्या या चलाख कामगिरीने तेथील स्थानिक ही अवाक होत पाहतच राहिले. या जिगरबाज व जीवाची बाजी लावून उडी मारुन महिलेला जीवदान देणाऱ्या या जवानाचे अभिनंदन केले.

जवान आवाळे हे मुळचे दौंडमधील पाटस या गावचे रहिवाशी असून पैलवान आहेत. ते पुणे अग्निशमन दलामधे गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असून त्यांनी दिवाळीमधे देखील अशीच कामगिरी करत एका पुरुष व महिलेला जिंवत बाहेर काढले होते. अशाप्रकारे जवान कोणताही असो तो जीवाची बाजी लावून प्राण पणाला लावतो हेच खरे.