गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले, दिड महिन्यातील चौथी घटना

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना ताज्या असताना पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात अज्ञात तिघांनी गोळबार करुन दहशत निर्माण केली. गस्तीवरील पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग केला; परंतु तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दीड महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन गोळीबार प्रकरणांचा तपास लागला नसताना पुन्हा गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली. नांदेड शहर व परिसरात काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटना नेहमीच घडत आहेत. व्यावसायिक सुरेश राठोड, आशिष पाटणी यांच्यावर गोळीबार झाला. शिवाय गोवर्धन घाट परिसरात गेल्या आठवड्यात काहींनी अती उत्साहात गोळीबार केला.

पोलिसांनी या प्रकरणात काहींना अटकही केली. परंतु, त्यांच्याकडे आढळलेली शस्रे कोठून आली याचा अद्याप शोध लागला नाही. इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास जैसे थे आहे. शहरात सर्रासपणे पिस्टल, गावठी बंदुकीचा वापर होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता तेजिंदरसिंघ मोहनसिंघ, मोनूसिंघ गाडीवाले, राजिंदरसिंघ व गुरूप्रितसिंघ कारपेंटर हे थांबले होते. एका कारजवळ तीन युवक सिगारेट ओढत होते. या चौघांनी त्यांना हटकले. या भागात तंबाखू, सिगारेटला मनाई आहे, असे त्यांना म्हणताच तिघांपैकी एकाने स्वत: जवळील बंदुकीने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी कोणालाही लागली नाही. त्यानंतर आरोपीने पुन्हा एक राऊंड झाडला. या घटनेनंतर आरडाओरड झाली.

काही नागरिक घराबाहेर पडण्याच्या तयारीत असतना आरोपी हरियाणा पासिंगचा नंबर असलेल्या कारमधून पसार झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी लगेच नाकाबंदी केली होती.