Pune : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर भरदिवसा गोळीबार, पिंपरी-चिंचवडसह पुण्यात प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज (बुधवार) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान, गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.

तानाजी पवार असे संशयिताचे नाव असून त्याला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, संशयित तानाजी पवार आणि त्याच्यासोबत आणखी एक जण आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात घुसले. आमदार बनसोडे हे त्यांच्या कार्यालयामध्ये होते. हल्लेखोरांनी गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर तात्काळ गोळीबार केला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून 3 राऊंड फायर केले. सुदैवाने बनसोडे सुखरूप आहेत. कार्यालयाच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी गोळीबार करणार्‍या संशयितास चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून पोलिसांना घटनास्थळावरून 2 पुंगळया, 10 ते 12 राऊंड, पिस्टल, 2 मॅझीन मिळाल्या आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.