दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ हजार ४५० कोटीच्या मदतीचा पहिला हप्ता वितरित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सध्या तीव्र दुष्काळाचा सामना करते आहे. अशात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्राला गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील भेडसावत आहे. या सर्व समस्येतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुष्काळ निधी देण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दुष्काळाची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप युद्ध पातळीवर केले जात असून राज्य सरकार यासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांचा निधी खर्च करत आहे. विभागीय आयुक्तांच्या स्तरावरून या निधीचे वितरण केले जाणार असून त्यांच्या माध्यमातून संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या कडे निधी वर्ग केला जाणार आहे.

या प्रशासकीय चौकटीतून गेल्या नंतर हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यासाठी गाव पातळीवर गाव कामगार तलाठी आणि कोतवाल यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे अशा काही गावामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.