Pandharpur By Election Result : पंढरपूर विजयानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘टप्प्याची भाषा करणारे…’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी होत आहे. या पोटनिवडणुकीत भालके यांना सहानभुती मिळणार की भाजपचे समाधान अवताडें बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाधान अवताडे यांच्या घराबाहेर जल्लोष करण्यास करण्यास सुरुवात केली आहे. समाधान अवताडे यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत राष्ट्रावादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र एकदा पिछाडीवर पडलेले भगिरथ भालके हे शेवटपर्यंत अवताडे यांची आघाडी तोडूच शकले नाहीत. समाधान अवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करण्यास सुरुवात केली.

हा सरकारविरोधातील जनतेचा कौल
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीची ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आलं की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा साम, दाम, दंड, भेद, सगळं करुनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच, असं उपाध्ये यांनी म्हटले आहे.

दिग्गजांनी केला प्रचार
राष्ट्रवादीचे भालके यांच्या प्रचाराकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे तळ ठोकून होते. मंत्री C तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराकरीता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.