काही मिनिटात ‘त्यांनी’ ट्रकभर माशांची केली लुट

खडगपूर : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावरुन जाणाऱ्या एखाद्या ट्रकचा अपघात झाला तर, त्या अपघातातील लोकांना वाचविण्याऐवजी त्या ट्रकमधील माल आजू बाजूच्या लोकांनी लुटून देण्याचे अनेक प्रसंग आपण मुंबई -पुणे अथवा नाशिक मार्गावर पाहिले असेल. ही मानसिकता सर्व देशात दिसून येते. पश्चिम बंगालमध्येही हा प्रसंग घडला. मासे घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यावर लोकांनी चक्क टोपल्या भरून मासे लुटून नेले.

आंध्र प्रदेशहून मासे घेऊन जाणारा ट्रक खडगपूर येथील महामार्गावर रस्त्याच्या कडेला उलटला. ही बातमी समजताच आजू बाजूच्या परिसरातील लोकांनी तेथे एकच गर्दी केली. काही लोक ट्रकवर चढले तर, काही जणांनी ट्रकवरील ताडपत्री बाजूला करुन आत शिरले. मोठ मोठ्या टोपल्या, क्रेट आणून लोकांनी या ट्रकमधील मासे लुटून नेले.

ट्रकचालकांनी लोकांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण, इतक्या मोठ्या जमावासमोर त्याचे काही चालले नाही. काही मिनिटांतच लोकांनी संपूर्ण ट्रक रिकामा केला. पश्चिम बंगालमधील लोकांना मासे हे अतिशय प्रिय. त्यात अशी फुकटची संधी मिळाल्यावर ती त्यांनी साधली नाही तर नवल.

Loading...
You might also like