साई भक्तांच्या गाडीला अपघात; ५ जण ठार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – साईदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला शिर्डी मार्गावरील पांगरीलगतच्या देवपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. खासगी प्रवासी बस आणि इनोव्हा कार यांच्यात झालेल्या या अपघातात पाच जण ठार झाले, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मृत प्रवासी मुंबईचे रहिवासी असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मुंबई येथील मीरा रोड परिसरातील २८ भाविक वेगवेगळ्या वाहनांतून शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. शिर्डीहून सिन्नरकडे परतत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ या वाहनांपैकी इनोव्हा कार आणि नाशिकहून शिर्डीकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसची देवपूर फाट्याजवळील भोकणी शिवारातील साईशोभा पेट्राेलपंपाजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. कारमधील सहापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नाशिकमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.

अपघातातील पवनाज जोशी (वय १२), ऋषी वराळे (वय १३) यांचा रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पवनी जोशी (वय १०) गंभीर जखमी असून, तिच्यावर मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना सिन्नरमार्गे नाशिककडे आणण्यात येत असताना वेळी शिंदे-पळसे मागार्वर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने जखमींन रूग्णालयात नेण्यात अडचण येत होती. अन्य तिघांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही वाहने भरधाव असल्याने चालकांना वाहने नियंत्रित करता आली नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.