Satara News : अपहरणप्रकरणी शिवसेनेच्या शेखर गोरे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना त्याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणाप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह ५ जणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शेखर गोरे, राजेंद्र उर्फ राजू जाधव, संग्राम अनिलकुमार शेटे, राहुल अर्जून गोरे, विरकुमार पोपटलाल गांधी, चालक हरिदास गायकवाड यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या ठरावावरून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी रात्री साठेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आले. त्यावेळी अपहरणकर्त्यांकडून अ‍ॅसीडद्वारे डॉ. नानासाहेब शिंदे यांची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या नंतर डॉक्टरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली. त्यानंतर रविवारी संध्याकाळी डॉक्टर अचानक घरी आहे. त्यामुळे त्यांचे अपहरण नक्की कोणी केले याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे प्रकरण ताजे असताना पानवच्या सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांनीसुद्धा आपले अपहरण झाल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे २ अपहरणांमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धनाजी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून शेखर गोरेंसह ५ जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हणले आहे कि, वरील संशयितांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवून कुळजाइमधील फार्महाऊसवर तसेच ठाण्यातील लॉजवर थांबवून ठेवले होते. दरम्यान डॉ. नानासाहेब शिंदे आणि धनाजी शिंदे यांच्या अपहरणाच्या प्रकारणाला एक वेगळेच वळण मिळाल्यामुळे पोलीसांकडून संबंधितांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर येईल.