अहमदनगर : जलशक्ती अभियानात जिल्ह्यात ‘हे’ पाच तालुके

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान (JSA) राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील आठ जिल्ह्यातील २० तालुक्यात हे अभियान राबविले जाणार असून यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि संगमनेर तालुक्यांचा समावेश आहे.

जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन मिळून हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. चेक डॅम, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन आदी कामांवर यांत भर दिला जाणार आहे.

पारंपरिक पाणीयोजना, तळी आदी संरचनांचे नूतनीकरण यांत केले जाणार आहे. तसेच विहीरी आणि विंधनविहीरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात विविध ठिकाणच्या विहीरी आणि विंधनविहीरींची पाहणी करुन जेथे पुनर्जिवित करणे शक्य आहे, तेथे कामांची सुरुवात केली जाणार आहे.

पाणलोट क्षेत्र विकासासाठीही या अभियानांतर्गत कामे केली जाणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नैसर्गिक संसाधन व जलसंधारण संबंधित कामांचे उद्दिष्ट्य साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्याचा पाटबंधारे आणि जलसंवर्धन आराखडा तयार करुन त्यानुसार या भागात आवश्यक कामे केली जाणार आहेत. जलशक्ती अभियान हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता यात स्थानिक स्तरावरील गाव सरपंच, पंचायत स्तरावरील पदाधिकारी यांचाही सहभाग घेतला जाणार आहेत.

जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रयत्नांचा एक भाग समाजातील विविध घटकांना यात सामावून घेता यावे म्हणून विविध दिवशी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. येत्या १५ जुलै रोजी  शालेय विद्यार्थी आणि इको क्लब दिवस साजरा केला जाणार आहे. पर्यावरण जागृती आणि जलसंवर्धनासाठी जाणीवजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दि. २२ जुलै रोजी क़ॉलेज कॅम्पस डे, दि. २९ जुलै रोजी समर इन्टर्नस् डे (राष्ट्रीय सेवा योजना / राष्ट्रीय छात्र सेना /  नेहरु युवा केंद्र यांचा सहभाग), दि. ३ ऑगस्ट रोजी डिफेन्स पर्सोनेल डे, दि. ५ ऑगस्ट रोजी केंद्रीय राखीव पोलीस दिवस, दि. १७ ऑगस्ट रोजी माजी सैनिक व सेवानिवृत्त दिवस, दि. २४ ऑगस्ट रोजी सरपंच दिवस, दि. ३१ ऑगस्ट रोजी स्वयंसहायता समूह दिवस आणि दिनांक ३ सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र मेळावा असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या जलशक्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय वनाधिकारी, संगमनेर, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना), जिल्हा परिषद, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग क्र. २, संगमनेरचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा यांचा या समितीत समावेश आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील

आरोग्यविषयक बातम्या

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर