‘फ्लिपकार्ट’नं घेतला मनसेचा धसका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन फिल्पकार्ट आणि ॲमेझॉन या कंपन्यांनी मराठीत ॲप आणावा अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल, असा इशारा दिला होता. याचा धसका घेत फ्लिपकार्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसेने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांना सात दिवसाची डेडलाईन दिली होती. दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांच्या ॲप मध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा असे बजावले होते. याच कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे अस स्पष्ट बजावले होते.

त्यानंतर फिल्पकार्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी इ कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात इ-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी; तसेच या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कटिबद्ध आहोत. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असणार आहे. भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर फ्लिपकार्टकडून करण्यात येणार आहे. मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील, याशिवाय लघु व मध्यम उद्योजक आणि कारागिरांना एक मोठा बाजारपेठ उपलब्ध होईल, असे फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.