अन्न व औषध प्रशासनाची कारवाई म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढल्याचा प्रकार, शिक्रापुरात गुटखा विक्रेत्यांवर छापे, तिघे अटकेत

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथे १० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अचानकपणे छापे टाकत किराणा दुकानातून बंदी असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापे टाकत काही गुटखा जप्त करून तिघांवर कारवाई करत अटक केली असल्याची घटना घडली असून योगेश कांतीलाल गिलबिले, नारायण भटाराम चौधरी, शिवाजी बंडू भोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून त्यांच्याकडून २२८१ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे, क्रांती बारावकर, एस. बि. अंकुश हे तिघे जण आले आणि त्यांनी पाबळ चौक परिसरातील श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स या दुकानात जात छापा टाकला असता येथे बंदी असलेला गुटखा आढळून आला यावेळी येथील ६३१ रुपयांचा गुटखा जप्त करत योगेश गिलबिले यास ताब्यात घेतले, त्यांनतर ओम ट्रेडर्स या दुकानात छापा टाकला असता येथे बंदी असलेला गुटखा आढळून आला यावेळी येथील १०१४ रुपयांचा गुटखा जप्त करत नारायण चौधरी यास ताब्यात घेतले, त्यांनतर लगेचच माऊली किराणा स्टोअर्स दुकानात छापा टाकला असता येथे बंदी असलेला गुटखा आढळून आला यावेळी येथील ६३६ रुपयांचा गुटखा जप्त करत शिवाजी भोळे यास ताब्यात घेतले यांच्याकडे गुटखा कोठून आणला याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील सर्व बंदी असलेला गुटखा जप्त केला, त्यांनतर याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे, क्रांती बारावकर, एस. बि. अंकुश तिघे रा. महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन ब्रेमन चौक औन्ध पुणे या तिघांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी योगेश कांतीलाल गिलबिले वय ३८ वर्षे रा. हिवरेरोड शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, नारायण भटाराम चौधरी वय ३२ वर्षे रा. इंद्रायणी कॉम्प्लेक्स पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, शिवाजी बंडू भोळे वय ६० वर्षे रा. पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे या तिघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागा गांभीर्याने घेणार का ?

शिक्रापूर त. शिरूर येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री होत असताना यापूर्वी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत मात्र यापूर्वीच्या कारवाया शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या आहेत परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे अशी झालेली आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत गुटखा पुरविणाऱ्या गुटखा माफियांवर कारवाई करणार का असा सवाल सर्वांना पडला आहे.