कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी Co-Win नोंदणी करायचीये? तर हे वाचा…

नवी दिल्ली : – देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारकडून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, आता 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 1 मे पासून कोरोना लस दिली जाणार आहे. ही लस घेण्यासाठी आजपासून (ता.28) नोंदणीला सुरुवात झाली आहे. को-विन (Co-Win) पोर्टलच्या माध्यमातून लस घेण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.

देशभरात लसीकरण मोहीमेला चांगला वेग आला आहे. 18 वर्षांवरील सर्वांना 28 एप्रिलपासून को-विन पोर्टलवर (Co-Win) नोंदणी करता येईल, असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, त्यामध्ये वेळेचा स्पष्ट उल्लेख नव्हता. म्हणून बऱ्याच जणांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासून नोंदणी करायला सुरुवात केली. पण या सर्वांना त्यामध्ये अडचणी येत होत्या. आता याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्ट वेळ सांगण्यात आली आहे. आज सायंकाळी चारपासून को-विन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

याबाबत आरोग्य सेतू अ‍ॅपच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले, की ’18 वर्षांवरील नागरिकांना 28 एप्रिलला http://cowin.gov.in या वेबसाईटवरून तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप आणि उमंग अ‍ॅपवरून सायंकाळी 4 पासून नोंदणी करता येईल. 1 मे रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी किती केंद्रे तयार आहेत, हे तपासून सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रातील अपॉइंटमेंट नागरिकांना दिल्या जातील’