मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान धर्मा पाटलांच्या पत्नी, मुलाला डांबून ठेवले

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील ८० वर्षीय धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला पोलिसांनी डांबून ठेवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पर्श्वभूमीवर पोलिसांनी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना आज सकाळी सहा वाजता ताब्यात घेतले. मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, जो पर्य़ंत मुख्यमंत्री येत नाहीत तो पर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याचा पवित्रा धर्मा पाटील यांच्या कुटुंबाने घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर मुख्यमंत्री दुपारी दोंडाईचाहून परत गेल्यावर पोलिसांनी त्यांना सोडलं. मात्र, आता मंत्री आल्याशिवाय आपण हलणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला. तसंच आता कुठलाही मंत्री गावात आल्यास मला आणि माझ्या कुटुंबाला असाच त्रास दिला जाणार का? असा सवालही नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं होतं.