धक्कादायक ! पाकिस्तानमध्ये दरवर्षी ‘इतक्या’ हिंदू-शीख मुलींचं होतं सक्तीने धर्मांतर, नंतर लग्न ! जाणून घ्या

लाहोर : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या लाहोरमधील नानकाना साहिब भागातून बेपत्ता झालेल्या शीख मुलीचा अद्याप शोध लागला नाही. असे म्हटले जात आहे की शीख मुलीचे सक्तीने धर्मांतर करून तिचा निकाह केला आहे. शनिवारी सकाळी बातमी आली की मुलगी सुखरुप घरी परतली आहे. परंतु मुलीच्या भावाने मात्र यास नकार देत अद्याप त्याला त्याच्या बहिणीबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. अशातच एक अहवाल समोर येत आहे ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे या गोष्टी नवीन नसून दरवर्षी जवळपास १ हजार मुलींना सक्तीने धर्मांतर करून लग्न करावे लागते.

या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे मुलीच्या भावाने सांगितले आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये ती मुलगी असे म्हणत आहे की ती स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करीत आहे. तर शीख मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले आहे.

मार्चमध्येही घडली होती अशी घटना :
यावर्षी मार्चमध्येही पाकिस्तानमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. यावर्षी होळीच्या दिवशी सिंध प्रांताच्या घोटकी जिल्ह्यातून रीना मेघवार आणि रवीना मेघवार या दोन बहिणी गायब झाल्या. दोन्ही मुलींना त्यांच्या घरातून उचलण्यात आले. दोन्ही मुलींचे वडील शमन हे मुली हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी त्या भागातील पोलिस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदारांनी मुली शोधण्याचे आश्वासन दिले पण गुन्हा मात्र नोंदविला नाही.

दुसर्‍याच दिवशी शमनने त्याच्या हिंदू नातेवाईक आणि मित्रांसह या गोष्टीचा निषेध केला. त्यानंतर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. ज्या दिवशी एफआयआर नोंदविली गेली त्याच दिवशी पाकिस्तानच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये रीना आणि रवीना दोघेही कल्मा वाचताना दिसल्या. त्या म्हणत होत्या की त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार इस्लाम स्वीकारला आहे. त्यावेळी होळीचा रंग अजूनही दोन्ही बहिणींच्या गालावर दिसत होता. रीना आणि रवीना या दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. दोघींनी अनुक्रमे सफदर अली आणि बरकत अलीसोबत लग्न केले होते. दोघेही आधीपासूनच विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. एका मदरशामध्ये दोन्ही मुलींचे आधी धर्मांतरण झाले आणि मग घाईघाईने लग्न झाले.
Reena-and-Raveena

रीना आणि रवीनाच्या बाबतीत तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही आक्षेप घेतला होता. त्यांनी यासंदर्भात पाकिस्तानमधील भारतीय राजदूतांकडून अहवाल मागविला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेले. पण अपहरण करुन धर्मांतर करण्याचा हा एक सुनियोजित कट होता, ज्यामध्ये काहीही करता आले नाही. दोन्ही मुलींनी त्यांच्या स्वेच्छेने धर्मांतर आणि लग्न स्वीकारले.

पाकिस्तानमध्ये हिंदू-शीख मुलींसोबत अशा घटना नेहमीच्या असून हिंदूंवर अत्याचाराची अशी कहाणी नवीन नाही. विशेषत: सिंध भागात. पाकिस्तानमध्ये राहणारे ९० टक्के हिंदू सिंध भागात राहतात. येथे त्यांना बर्‍याचदा बहुसंख्य मुस्लिमांच्या द्वेषाला बळी पडावे लागते.

पाकिस्तानमध्ये गरीब हिंदू मुलींना सक्तीने धार्मिक धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे :
२०१५ मध्ये पाकिस्तानच्या ‘औरत’ फाऊंडेशनने साउथ एशिया पार्टनरशिप च्या सहकार्याने एक अहवाल तयार केला. या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे १ हजार मुलींना धार्मिक रूपांतर करण्यास भाग पाडले जाते. हा प्रकार सिंध प्रांतातील उमरकोट, थारपारकर, मीरपूर खास, संघार, घोटकी आणि जकोबाडा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या भागातील बहुतेक हिंदू गरीब आहेत. याचा फायदा घेत त्यांच्या मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते.

या भागात दोन मदरसे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे दर्गा पीर भरचंडी शरीफ आणि दुसरी दर्गा पीर सरहंडी. या दोन मदरशांमध्ये धर्म परिवर्तन करण्याचा व्यवसाय आहे. या दोन्ही मदरशांनी दहशत परिसरात पसरली आहे. मीरपूर खास, थारपारकर आणि उमरकोटमध्ये धर्मांतराच्या घटना सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

अल्पसंख्यांकांवर वाढता अत्याचार :
पाकिस्तानात हिंदू, शीख, ख्रिश्चन, अहमदी आणि हाजरा यासारख्या समुदाय अल्पसंख्याक समाजात येतात. या समुदायांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ झाली आहे. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या संघटनेने २०१७ मध्ये या समुदायांवरील हल्ल्यांचा अहवाल जारी केला होता.

अहवालात असे म्हटले होते की अल्पसंख्याक समाजातील लोक सतत गायब होत आहेत. त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. पाकिस्तानच्या कट्टरपंथी शक्तींनी याला पाठिंबा दर्शविला आहे. एका आकडेवारीनुसार, स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांमध्ये २० टक्क्यांहून अधिक लोक होते. आज त्यांची लोकसंख्या घटून केवळ ३ टक्के झाली आहे.

२०१७ मध्ये जगातील ख्रिश्चन समुदायाच्या स्थितीबद्दल एक अहवाल आला. त्यात ५० देशांची नावे आहेत जिथे ख्रिश्चन धर्मियांना राहणे सर्वात अवघड आहे. त्या यादीमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर होता.

आरोग्यविषयक वृत्त –