‘चक दे’ची प्रेरणा असलेल्या खेळाडूला पतीकडून ‘बेदम’ मारहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हॉकी महिला संघाच्या कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या सुरज लता देवी यांना त्यांच्या पतीनेच अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी तो माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता अशी माहिती सूरज देवींनी पत्रकार परिषदेत दिली, या प्रकरणी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल केला गेला आहे.

२००५ साली माझे लग्न झाले तेव्हापासून तो माझा हुंड्यासाठी छळ करत होता आणि मी जेव्हा खेळात जिंकलेली पदके आणि बक्षिसे घेऊन आले तेव्हा या सगळ्याच पुढे काय उपयोग असे म्हणून मला जेव्हा अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हा त्याने माझ्यावर अनैतिकतेचा आरोप सुद्धा केला होता. एखादी गोष्ट सहन करायला एक मर्यादा असते, मला ही गोष्ट लोकांसमोर आणायची नव्हती.पण, नोव्हेंबर २०१९ मध्ये दारू पिऊन माझ्या पतीने मला अमानुष मारहाण केली होती त्या वेळी मी रेल्वे कोच फॅक्टरी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सामना अधिकारी म्हणून काम बघत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पती विरुद्ध जानेवारी महिन्यात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सुलतानपूर लोधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. कलम 498 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरज लता देवी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 ची राष्ट्रकुल स्पर्धा, 2003 मध्ये अ‍ॅफ्रो एशियन गेम्स, हॉकी एशिया गेम्स या तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. राष्ट्रकुलमध्ये मिळवलेल्या विजेतेपदावर 2007 मध्ये चक दे इंडिया हा चित्रपटही काढण्यात आला होता.

You might also like