CBI चे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचे दिल्लीत निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सीबीआयचे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचे दिल्लीत निधन झाले. एएनआयच्या वृत्तानुसार, 68 वर्षीय सिन्हा यांनी दिल्लीत शुक्रवारी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

आपल्या प्रोफेशनल करियरमध्ये सिन्हा यांनी सीबीआय डायरेक्टर, आयटीबीपी डीजी सारख्या महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झाले होते. सीबीआयनेच त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी सीबीआय डायरेक्टर पदावर असताना कोळसा वाटप घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता.

सिन्हा यांच्या संशयास्पद भूमिकेच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिले होते. या आदेशानुसार सीबीआयने सिन्हा यांच्या विरूद्ध एफआयआर दाखल केला होता.

1974 बॅचचे रिटायर्ड आयपीएस अधिकारी रंजीत सिन्हा 2012 ते 2014 च्या दरम्यान दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक होते. सीबीआयचे संचालक असताना आपल्या निवास्थानी कोळसा वाटपातील काही आरोपींची कथित भेट घेतल्याने ते वादात सापडले होते. यानंतर रंजीत सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.