इंदिरा गांधी यांची कॉपी करू नका ; माजी मुख्यमंत्र्यांचे प्रियंकांना खडे बोल  

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था- काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या उत्तर प्रदेश दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यानमध्ये प्रियंका गांधी यांच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या कृतीने उत्साह संचारला आहे.उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी लोकांना पाहण्यास मिळाली आहे. त्याच प्रमाणे लखनऊ येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रियंका इंदिरा गांधी यांच्याच छबीत दर्शवण्यात आल्या होत्या. त्याच मुद्द्यांवर त्या सोशल मीडियात ट्रोल देखील झाल्या आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी प्रियांका गांधी यांना चांगलेच शाब्दिक टोले लगावले आहेत. बादल यांनी प्रियंका गांधी यांनी आपल्या आज्जीची नक्कल करू नये असे म्हणले आहे. प्रियंका गांधी इंदिरा गांधी सारख्या दिसतात म्हणून त्या इंदिरा गांधींना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी विनंती करत आहे कि कृपया तुम्ही त्यांची कॉपी करू नका कारण इंदिरा गांधी यांनी जे काम केले आहे ते काम पुन्हा होऊ शकत नाही असे प्रकाशसिंग बादल यांनी म्हणले आहे.

इंदिरा गांधी यांनी श्री  हरमंदिर साहिबवर हल्ला करवला होता. अशी कॉपी प्रियंका गांधी यांनी करू नये. त्याच प्रमाणे प्रियंका गांधी राजकारणात आल्याने काँग्रेसला कसलाही फायदा होणार नाही असे हि प्रकाशसिंग बादल म्हणाले आहेत.