‘कोरोना’मुळं सेहवाग आणि गंभीर यांच्या जवळच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू, BCCI नं व्यक्त केलं दुःख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दिल्लीचा क्लब क्रिकेटर संजय डोभाल यांचे सोमवारी निधन झाले. 53 वर्षाचे संजय हे दिल्ली क्रिकेटचे एक सुप्रसिद्ध नाव होते आणि दिल्ली अंडर -23 संघात सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करत होते. माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने संजय यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

दिल्ली क्रिकेट असोसिएशनने डोभाल यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून डीडीसीएच्या अधिकाऱ्याने कुटुंबीयांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. निवेदनात म्हटले गेले कि, “संजय डोभाल यांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे असल्याचे आढळले. त्यांना बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. कोरोना संसर्गासाठी त्याची सकारात्मक चाचणी घेण्यात आली. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना द्वारका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोभाल यांना प्लाझ्मा थेरपी दिली जात होती पण त्याचा काही परिणाम झाला नाही. दरम्यान डोभाल त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव सिद्धांत असून तो राजस्थानकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो तर लहान मुलगा आकाश दिल्ली अंडर -23 संघात आहे.

दिल्लीचे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मनहास आणि आकाश चोप्रा यांच्याशी डोभालचे खूप चांगले संबंध होते. तब्येत बिघडल्यानंतर दिल्लीचे भाजप खासदार आणि माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर यांनी ट्विटरद्वारे त्यांच्यासाठी प्लाझ्मा देणगीची विनंती केली होती. तसेच दिल्लीचे सत्ताधारी पक्ष आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांनी डोभालसाठी रक्तदात्याची व्यवस्था केली होती, पण तरीही त्यांचा जीव वाचला नाही. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सीके खन्ना, मदन लाल, आकाश चोपडा आणि मिथुम मनहास यांनी सोशल मीडियावर डोभाल को यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.