12 वी शिकलेले 4 बोगस डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काही बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई पोलिसांनी सुरूच ठेवली आहे. यानंतर आता सायन परिसरातून 4 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 4 च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायन पूर्वमधून या चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दलसिंग सतई यादव (59), अनिलकुमार जगदीशप्रसाद बंद (41), राकेश रघुनाथ तिवारी (44), मोतीलाल विदेशी मोर्या (51) अशी चारही अरोपींची नावे आहेत.

अनेक बोगस डॉक्टर असे आहेत जे त्यांच्यावर होणारी कारवाई थंडावल्यानं झोपडपट्टी किंवा दाट वस्त्यांमध्ये आपलं दुकान थाटून आहेत आणि ते रुग्णांची फसवणूक करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून बोगस डॉक्टरांविरोधातली कारवाई सुरुच आहे. काही माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष 4 च्या पोलिसांनी मुंबई महानगर पालिकेच्या संबधित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह सायन परिसरात एकाच वेळी 4 ठिकाणी छापे टाकले. यात चार बोगस डॉक्टर पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हे चारही बोगस डॉक्टर 12 वी पर्यंत शिकलेले असून त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही पदवी नाही तसेच कोणतेही प्रमाणपत्रही नसल्याचं उघड झालं. वडाळा टी टी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चारही बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं चौघांनाही 12 डिसेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे.

Visit : Policenama.com