चाइल्ड पॉर्नोग्राफी : चौघांवर पिंपरी पोलिसांची कारवाई, FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पॉर्न साईटवर मौजेसाठी पाहिलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ सोशल मिडियावर फॉरवर्ड करणाऱ्यांवर पुण्यापाठोपाठ आता पिंंपरी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पिंपरी पोलिसांनी अशा चार जणांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकड, चिखली पोलिसांनी प्रत्येक एक तर चाकण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅड एक्स्प्रोइटेड चिल्नस (एनईएमईसी) मार्फत गोपनीय टीप लाइन्स नंबर पोलीस महासंचालकांना पाठविले. त्यांच्याकडून ते राज्यातील सर्व पोलीस घटकातील सायबर क्राइम शाखांना पाठविण्यात आले आहे. संबंधित सायबर शाखांमार्फत ज्या मोबाईलवरुन हे अश्लिल व्हिडिओ अपलोड करण्यात आले. त्या मोबाइलधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यात ३ गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राइमने अशा लहान मुलांचे अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करण्यांवर कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांनी गेल्या वर्षी एप्रिल २०१९ मध्ये फेसबुकवर हे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले होते. चाकण पोलिसांनी याप्रकरणी किशोर वाघमारे आणि अजय सागर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी महेश सवानी आणि चिखली पोलिसांनी बालाराम दास यांच्यावर आयटी अ‍ॅक्ट आणि पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

चाइल्ड पॉर्नोग्राफीचे हे व्हिडिओ प्रामुख्याने परदेशातील असून गुगलने ते आता साईटवरुन काढून टाकले आहेत. सायबर क्राइमकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सोशल मिडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओची एसएलआर पोलीस महासंचालकांकडून पाठविण्यात आली असून त्यात असे असंख्य व्हिडिओ आहेत. त्यांची तपासणी करुन त्यानुसार गुन्हे दाखल करुन आरोपींना अटक करण्यात येणार आहे. त्यामुळे कायद्याची माहिती नसलेले व मौजमजेसाठी मित्रमैत्रिणींना अथवा सोशल मिडियावर यापूर्वी ज्यांनी ज्यांनी चाइल्ड पॉनोग्राफी फॉरवर्ड केले होते ते आता वर्षभरानंतर अडचणीत येणार आहेत.