अवघ्या 14 वर्षांची सहरीश झाली बुलढाण्याची पोलिस अधीक्षक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – आपण नायक चित्रपट पहिलाच असेल, त्यामध्ये चित्रपटामध्ये नायक हा काही वेळेसाठी मुख्यमंत्री होऊन राज्याला शिस्त लावतो, अत्याचार संपवितो, भ्रष्टाचार संपवितो. हे सर्व फक्त चित्रपटामध्येच घडू शकते, वास्तवात नाही. जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने बालमनातील याच इच्छा पूर्ण केल्या जात आहेत. सहरीश कंवल हिला बुधवारी एका दिवसासाठी बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. याअगोदर ‘एक दिवसाची कलेक्टर’ उपक्रमही राबविण्यात आला होता.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळे असे उपक्रम हे राबिवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक व सामुदायिक उत्तरदायित्वाची भूमिका रूजविण्यासाठी एक दिवसाची जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी सहरीश कंवल हिच्याकडे सांकेतिक स्वरूपात जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार सोपविला आहे.

सहरीशचे वडील अब्दूल आसिफ हे गॅरेज मेकॅनिक तर आई समिना शिरीन गृहिणी आहे. सहरीशचे पोलीस मुख्यालयात ऐटीत आगमन झाले. सशस्त्र तुकडीने सहरीशला मानवंदना दिली. पोलिस अधीक्षकांनी मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. डॉ. भुजबळ यांनी बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अत्याचार प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. त्याचबरोबर असा विश्वास व्यक्त केला कि, जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन हे महिलांना आपल्या माहेरासारखे वाटेल या उदात्त विचारधारेकडे जिल्हा पोलिस प्रशासनाची वाटचाल राहील.