अहमदनगर : फायनान्स कंपनीनं घातला अनेकांना गंडा, ऑफीस बंद करून फरार

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन – लाखो रुपयांचे कर्ज देण्याच्या नावाखाली बनावट फायनान्स कंपन्या स्थापन करून कुकाणा परिसरातील सर्वसामान्यांचे लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर संबंधितांनी गाशा गुंडाळून पलायन केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कुकाणा येथील जेऊर हैबती चौकात काही बदमाशांनी फायनान्स कंपनीचे कार्यालय थाटले होते. त्या माध्यमातून परिसरातील सर्वसामान्य लोकांना त्यांनी लाखो रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये जमा करून घेतले होते. तसेच आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर ठेवीही जमा केल्या. याच परिसरातील ‘व्हाइट कॉलर’ बदमाश गुंतलेले असल्याचा आरोप होत आहे.

लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने अनेकांकडून पोलिसांकडे तक्रार केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.