दिलासादायक ! ‘या’ योजनेतून होणार मोफत उपचार, पैसे घेतल्यास 5 पट दंड :ठाकरे सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार होतील. यासंदर्भात विशेष आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. उपचारासाठी पैसे घेतले तर पाचपट दंड आकारण्यात येईल, तसेच परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव, कोरोना विरोधातील लढा आणि अडचणी यावर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील यावर लक्ष द्यावे. तसेच आगमन आणि विसर्जनाची मिरवणुकीवर मर्यादा हवी. सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.

जीमबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार

जीमबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार कोणत्या गोष्टी शिथिल करायच्या याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. जिम सुरु झाल्या पाहिजेत हे माझंही मत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आग्रही भूमिका मांडणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

आरोग्य विभागात लवकरच भरती

शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागातील वर्ग क आणि वर्ग ड ची भरती लवकरात लवकर केल्या जातील अशी माहिती टोपे यांनी दिली.