प्रविण दरेकरांचा सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘आतातरी राजकारण थांबवा, लसीकरण निश्चित वेळेतच व्हायला हवं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लसीकरणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. लसीकरण सुलभ करण्याची केंद्राचीही मानसिकता आहे आणि आमचीही आहे. पण नियोजनाचा भाग राज्य सरकारचा आहे. मुंबईत एक ते दीड लाख लसी उपलब्ध असताना 40 ते 50 केंद्र बंद होती. आता तरी यामध्ये राजकारण करु नका. केंद्रासोबत समन्वय साधून लस उपलब्ध करुन जनतेचे लसीकरण वेळेत करा, ते फार लाबणं जनतेच्या जीविताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. यामध्ये राज्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना सरकारी रुग्णालयात आणि लसीकरण केंद्रावर मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासोबतच लसींचा साठा अपुरा असल्याने 1 मे पासून राज्यात या वयोगटासाठी लसीकरण सुरु करता येणार नाही, अशी देखील माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

दरेकर म्हणाले, निश्चित वेळेत लसीकरण झाले नाही,तर त्यादरम्यान ज्या संकटाला सामोरं जावं लागेल, ते आपल्याला परवडणारे नाही. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन घेणे. केंद्र सरकारसोबत वाद न घालता समन्वय ठेवावा. खासगी पातळीवर जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन घेऊन 1 मे पासून लसीकरण करण्याची गरज आहे. कारण सहा महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी सांगितले. प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

आता राजकारणापलिकडे जाऊन लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष देखील यासाठी सरकारसोबत आहे. एकीकडे मोफत लस जाहीर करायची आणि दुसरीकडे लस अपुरी असल्याचे सांगायचे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणतात लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरण केंद्र सुरु करणार नाही. मात्र जशी लस उपलब्ध होईल तशी केंद्रे सुरु केली पाहिजेत. अमुक साठा आला तरच केंद्र सुर करणार अशी भूमिका जनतेवर अन्याय करणारी ठरेल, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.