‘या’ तीन प्रमुख बँकांचे आर्थिक निर्बंध RBI ने हटवले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेतर्फे सार्वजनिक क्षेत्रातील एकूण ११ बँकांवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’वरील (महाबँक) आर्थिक निर्बंध (पीसीए) रिझर्व्ह बँकेने उठवले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध मागे घेतल्यामुळे तिन्ही बँकांना नव्याने कर्जे देण्याची आणि व्यवसाय पूर्वपदावर आणण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त भांडवली गुंतवणूक केल्यामुळे बँकेचा निव्वळ एनपीए सहा टक्क्यांच्या खाली गेला आहे. त्यामुळे ही बँकही निर्बंधांतून बाहेर आली आहे. मात्र, तरीही या बँकेवर रिझर्व्ह बँकेने काही अटी आणि शर्ती लादल्या असून, बँकेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

‘बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांना घालून दिलेल्या मर्यादेनुसार कामगिरी बजावली आहे. या व्यतिरिक्त डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) सहा टक्क्यांच्या खाली गेले आहे. त्यामुळे या बँकांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

तोट्यात असलेल्या तसेच, बुडीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एकूण ११ सरकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी आर्थिक निर्बंध घातले होते. यामुळे या बँकांच्या व्यवहारांवर तसेच अधिकारांवर मर्यादा आली होती. मात्र चांगल्या कर्जवसुलीमुळे या बँकांची स्थिती काही दिवसांपासून सुधारल्याने हे निर्बंध मागे घेण्यात आले होते.