मद्यधुंद चालकाचा कंटेनरसह सिनेस्टाईल ‘थरार’ ! ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’

पोलीसनामा ऑनलाईन, जळगाव, दि. 26 जुलै: जळगावकरांना रविवारी भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. मद्यधुंद कंटेनरचालकाने अनेक वाहनांना उडविल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, यावेळी सुदैवाने ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’…अशी परिस्थिती झाल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मद्यधुंद चालकाने शहरातील पोलीस चौकीला धडक दिली. याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्या दारुच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय- 39 रा. कर्हे वडगाव, ता.आष्टी जि. बीड) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नेरी ते जळगाव शहरातून अजिंठा चौफुली ते रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनर चालकाने अनेक वाहने उडवल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. भरधाव कंटेरनेर नेरी ते जळगावदरम्यान अनेक वाहने उडविले.

चालक भाऊसाहेब खांडवे हा मद्यधुंद अवस्थेत होता. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. भरधाव कंटेनर येत असल्याचे बघताच अनेक जणांनी रस्त्यावरून बाजूला होऊन आपला जीव वाचवला. अन्यथा, आज जळगाव शहरात मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेत अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. शहर पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सुरक्षारक्षकाच्या कपाळाला पिस्तूल लावून तीन कैदी पळाल्याच्या घटनेने शनिवारी जळगाव शहर हादरले होतं. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये होणार्‍या हाणामारी, कैद्यांना भेटणार्‍यांवर होणारे हल्ले, तसेच कैदी पळून जाणे, अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात शनिवारी सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी थेट सुरक्षारक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली. यात धक्कादायक म्हणजे, तिन्ही गुन्हेगारांना घेण्यासाठी चक्क एक दुचाकीस्वार कारागृहाबाहेर आला होता. त्यामुळे या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे.