महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर २०१९ ची लोकसभा निवडणुक लढणार ? 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. आता सर्व पक्षांना वेध लागलेत ते दमदार उमेदवार निवडीचे. तसेच इच्छुक उमेदवार देखील उमेदवारीसाठी ज्या त्या पक्ष श्रेष्ठींकडे खेटे घालत आहेत, असे असतानाच भारतीय क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज  नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघांचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर हे दोघे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एका वृत्तातून ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना तिकीट मिळू शकते असेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. त्यामुळे गंभीरला दिल्लीतून तर धोनीला झारखंडमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरला दिल्लीतून उमेदवारी –

यापूर्वी देखील गौतम गंभीरचे नाव भाजपचा उमेदवार म्हणून चर्चेत होते . मात्र आगामी लोकसभा निवडणुकीकरिता तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. सध्या भाजपच्या दिल्लीच्या खासदार मिनाक्षी लेखी यांच्या कामकाजावर भाजपचे पक्षश्रेष्ठी समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर गंभीरला संधी मिळू शकते,  अशी शक्यता वर्तवण्यात  येत आहे. तसेच गौतम  गंभीर क्रिकेटमधील त्याच्या चांगल्या कामगिरीबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील त्याचे दिल्लीत नाव आहे. तसेच तो मुळचा दिल्लीकर आहे त्याचा फायदा देखील भाजपाला होऊ शकतो , असे एका वरिष्ठ भाजप नेत्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.

त्याचबरोबर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशीही भाजपाची बोलणी सुरु आहे. याद्वारे भाजपा या दोन्ही स्टार खेळाडूंच्या करिश्म्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण देशभरात त्यांना घेऊन भाजपा प्रचार मोहिमा राबवू शकते. हे दोघेही त्यांच्या राज्यांपुरतेच नव्हे तर देशाचेही प्रतिनिधित्व करतात. धोनी सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे त्यामुळे दक्षिणेतही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात

भाजपचा ‘ स्टार ‘ अजेंडा –

२०१४ च्या निवडणुकीत मोदींनी सोशल  मीडीयाला हाताशी धरून ‘ब्रॅण्ड ‘ मोदी नावारूपाला आणला  परंतु आता मात्र नोटबंदी , जीएसटी , पेट्रोल दरवाढ  यामुळे नाराज झालेल्या जनतेला आगामी लोकसभा निवडणुकीकरिता पुन्हा भाजपाकडे कसे वळवायचे हा मोठा प्रश्न भाजपाकडे आहे. त्यामुळे आता आधीपासूनच समाजात ‘स्टार ‘ असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन भाजपा नविन  स्ट्रॅटेजी वापरू पाहतो आहे की काय असे एकंदरीत भाजपच्या सध्याच्या वातावरणावरून वाटते आहे.

‘संपर्क फॉर समर्थन’ –

भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ अशी एका मोहीम सुरु केली होती.  या मोहिमेअंतर्गदेखील अमित शहा देशातील काही महत्वाच्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटले होते. यात अभिनेत्री माधुरी दीक्षित तसेच महेंद्रसिंग धोनी यांना देखील ते भेटले होते. तेव्हा देखील आगामी लोकसभा निवडणुकीत महेंद्रसिंग धोनीला भाजप उमेदवारी देणार अशी जोरदार चर्चा चालू होती. पण स्वतः धोनीने मी राजकारणात येणार नाही असे म्हंटल  होते पण आता पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीचे नाव आगामी लोकसभा निवडणुकीकरिता चर्चेत आले आहे.